रेव्हनंट - मृत्यू पाहून परतलेला माणूस
लिओनार्डोला यावर्षी तरी ऑस्कर मिळणार का... या प्रश्नाने आपली उत्सुकता चाळवून, बरोबर ऑस्कर जवळ आले की, नॉमिनेटेड् चित्रपट लावून आपल्याला मार्केटिंगच्या जाळ्यात पकडणारा यावर्षीचा चित्रपट आहे 'रेव्हनंट' . १८२३ का त्याच्या आसपासच्या काळात घडणारी एक कमालीची 'ग्रिपिंग' सूडकथा.
लिओनार्डोने आत्तापर्यंत त्याच्या 'कॅच मी इफ् यू कॅन' या स्पिलबर्गपटातून किंवा 'एव्हिएटर', 'डिपार्टेटेड', 'वॉलस्ट्रीट वूल्फ्' सारख्या स्कॉर्सेसी पटातून त्याच्या अभिनयाचा समृद्ध कलर पॅलेट आपल्याला दाखवलाच होता, पण इथे जे काही आपल्याला बघायला मिळतं ते फारच अद्भूत आहे. ह्यू ग्लास नावाची व्यक्तिरेखा तो अक्षरशः जगलाय. वायव्य अमेरिकेच्या दंतकथांचा भाग बनलेली या ग्लास नावाच्या एका साहसी व्यापा-याची मृत्यूशी झगडा देत जिद्द आणि चिकाटीवर पूर्ण केलेली २०० मैलाची खडतर सफर हा या चित्रपटाचा संपूर्ण पट. पण या सफरीच्या मागे आहे ते ग्लासचं अपरिमित दुःख आणि पराकोटीच्या सूडाची भावना. मूळात अतिशय प्रेमळ आणि हळव्या कौटुंबिक माणसाच्या उरल्यासुरल्या विश्वालाच जेव्हा नष्ट केलं जातं तेव्हा त्याचं काय होतं हे सर्व लिओनार्डोने हुबेहुब आपल्यापुढे उभं केलंय.
अमेरिकेतल्या काही प्रसिद्ध ऐतिहासिक व्यक्तिरेखा ज्या फारशा आपल्याला माहिती नाहीत त्यापैकी ह्यू ग्लास हा एक. त्याच्याबद्दल सिनेमा पाहिल्यानंतर जे काही वाचायला मिळालं ते केवळ थक्क करणारं होतं, पण ते वाचल्यानंतर जाणवलं की ग्लासच्या वर्णनात मी नवीन असं काहीच वाचत नव्हतो कारण ते मला लिओने आधीच पोचवलं होतं. निसर्गाच्या रौद्र, किंबहुना क्रूर रूपाची यथायोग्य माहिती असणारा, अतिशय हुशार पण तितकाच चिवट, आपल्या संसारात रममाण झालेला प्रेमळ पती आणि पिता आणि दुर्दम्य इच्छाशक्ती असणारा साहसवीर लिओने आपल्यासमोर जिवंत केलेला आहे.
पण हे जिवंत चित्रण एकट्या लिओचं श्रेय नाही, तर एका कमालीच्या प्रतिभावान स्टोरीटेलरचं एलिआंद्रो इलारिट्टू या मेक्सिकन् दिग्दर्शकाचंही त्याचं कॅमेरावर्क हे तुम्हाला त्या सगळ्या अॅक्शनच्या अगदी मधोमधच घेऊन जातं. विशेषतः ग्लासवरचा ग्रिजली बेअरने केलेला प्राणघातक हल्ला बघताना जणू काही त्या अस्वलाचा अक्राळविक्राळ श्वासच तुमच्या मानेवर, खांद्यावरून गेल्याची प्रचिती तुम्हाला येते. अमेरिकेतल्या वायव्य भागातल्या हाडं गोठवणा-या, क्षणात तुमच्या शरीराचा दगड बनवणा-या निष्ठूर हिवाळ्याचं त्यानं केलेलं चित्रण म्हणजे जणू काही या चित्रपटातलं ग्लास किंवा फिट्जेराल्डसारखंच एक महत्वाचं पात्रच बनवलं आहे. जर तुम्ही ती हाडं गोठवणारी थंडी अनुभवली असेल तर तो अनुभव तुम्ही अगदीच समजू शकता. मागच्या वर्षी बर्डमॅनसाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचं बक्षिस मिळवल्यानंतर या ही वर्षी ती किमया एलिआंद्रो करणार का ही उत्सुकता ताणणारी गोष्ट आहे.
लिओ आणि एलिआंद्रोइतकाच या चित्रपटाचा अविभाज्य भाग आहे टॉम हार्डी नावाचा ब्रिटीश नट. याला पण आपण लिओबरोबर नोलनच्या 'इनसेप्शन्' मध्ये पाहिलाय, पण इथला त्याचा उलट्या काळजाचा, नीच, स्वार्थी फिट्जेराल्ड् फारच लाजवाब, अख्ख्या चित्रपटाला तोच कार्यकारण भाव बनला आहे.
सूडकथा जरी असली तरी ती कथा आपल्याला सांगून जाते मानवाचे आदिम भाव आणि त्याचबरोबर मानवाने आदिम भावांवर मात करत कमावलेली दया आणि करूणा. आज सगळ्या जगावर राज्य करणा-या अमेरिकेचे तिथल्या आदिवासी नेटिव्ह् इंडियन्स् ना क्रूरपणे नेस्तनाबूत करणारे लाजिरवाणे वास्तव, आणि रानटी म्हणून हिणवल्या जाणा-या आदिवासींकडून तथाकथित सुसंस्कृत अमेरिकन आणि फ्रेंच व्यापा-यांना दिली जाणारी मानवतेची शिकवणी. आणि ठिकठिकाणी पेरलेला मानवाच्या देव नावाच्या संकल्पनेशी होणारा सामना. अशा अनेक वैचारिक पातळींवर हिंडणारा पण तेवढाच एक क्षणही तुमची गचांडी न सोडणारा हा चित्रपट तुम्ही सोडू नका नक्की
तुम्ही हा लेख वाचत असाल तेव्हा लिओने आपलं जिंक्स् मोडलं असेल किंवा नसेल एलिआंद्रोने सलग दुस-यांदा हा किताब जिंकला असेल अथवा नसेल, तरीही हा खूर्चीला खिळवून ठेवणारा, हाडं गोठवतानाच, मानवतेचं उबदार दर्शन घडवणारा अनुभव तुम्ही चुकवला नसावा हीच आशा....


0 Comments:
Post a Comment
<< Home