Monday, March 07, 2016

स्पॅाटलाईट् - भेदरलेल्या छोट्यांचं भेदक वास्तव्य...

नेहमीच्या  दिमाखात, जोषात या वर्षीचे ऑस्कर्स् रितीनियमाप्रमाणे फेब्रुवारीच्या शेवटच्या रविवारी पार पडलेच (या वर्षी जरा  "काळं" गालबोट लागलं असलं तरी), आणि जगभरात, अगदी आमच्या पुण्यनगरीतही जिंकलेल्यांपैकी, नॉमिनेट् झालेल्यांपैकी किती मी पाहिले, किती तू पाहिले ही अहमहमिका मित्रमंडळीत चालू  झालीच. त्यात  सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं बक्षिस मिळालेला  "स्पॉटलाईट्" फार  लोकांनी पाहिलेला आढळला नाही, पुण्यातल्या माझ्या चित्रकंडू मित्रमंडळीतही...

कारण मुख्य म्हणजे भारतात तो बहुदा रिलीज् झालाच नाही. त्यामागे विषयाची संवेदना  कितपत आहे हा संशोधनाचाच विषय व्हावा, कारण मला खात्री आहे, अमेरिकेतसुद्धा सर्वच राज्यांमधे त्याला तितकासा  जोरकस प्रतिसाद मिळाला नसावा. (सात कोटी डॉलर्स् च्या घरात जेमतेम त्याची कमाई आहे, आणि रेव्हनंटची 42 कोटीच्या घरात, यावरून अंदाज यावा)  कारण तो विषयच तसा आहे, जर उद्या आपल्या देवघरातच हिणकस प्रकार चालू आहेत आणि तेही आपल्या घरच्या थोरांच्या संगनमताने नाही तरी थोड्याफार संमतीनंच तर आपण  त्याबद्दल दबक्याही आवाजात कितपत बोलू ही शंकाच आहे नाही... थोडंफार तसंच लिबरल् , फर्स्ट अमेंडमेंटचे गोडवे गाणा-या त्या देशाचंही असावं .

पण अशा विषयावर चित्रपट काढणं आणि त्यातील सत्यासत्यतेची परखड छानबिन तितक्याच निर्भिडपणानं दाखवणं हे या चित्रपटाचं सर्वात मोठं श्रेय म्हणावं लागेल. आणि त्याहीपेक्षा दाद द्यावी लागेल म्हणजे त्याच्या कुठल्याही नाट्यमय प्रसंगाशिवाय केलेल्या पूर्णतः नैसर्गिक मांडणीची. आपल्याला जणू वाटावं की आपण त्या बो्स्टन् ग्लोब् च्या ऑफिसातच बसलोय.

आणि खरं तर कुठल्याही बाह्य नाट्याची तशी या कथानकाला गरज भासू नये. धर्माच्या नावाखाली, जिथे अश्राप जनतेवर त्यांच्या या असाहाय्यतेचा त्यांच्याही नकळत फायदा घेत नामानिराळे राहाणारी "संत" मंडळी राहात होती त्यात अजून वेगळ्या नाट्याची गरजच काय? पण मग उरतत ती त्या काळ्याकुट्ट वास्तवाला उलगडत नेणारी काहीशी तुर्रेबाज पत्रकार मंडळी आणि अन्यायाला वाचा फोडायला लावणारी त्यांची जिद्द. ती तुमच्या नकळत ते इतक्या समर्थपणे उभी करतात की बस्स रे बस्स.

 मग त्यात बॅटमॅन् म्हणून गाजलेला, गतकाळचा हिरो मायकेल कीटन् असो किंवा हल्क् म्हणून मुलांचं मनोरंजन करणारा सध्याचा हिरो मार्क रफेलो असो. त्यांच्या त्यांच्या पात्रातील बारकावे कुठल्याही आट्यापिट्याशिवाय इतके ठाशीवपणे मांडतात की जणू काही प्रत्यक्षातले मायकल आणि रॉबीच तुमच्या आजूबाजूला वावरतायत असं तुम्हाला वाटतं.  पण माझं व्होट गेलंय ते मार्टी बॅरनचं छोटंसं पण अत्यंत प्रभावित करणारं काम करणा-या लीव्ह श्रायबरला. नव्याने आलेला या सगळ्यांचा हा बॉस, ज्याची न्याय मिळवून देण्याची प्रखर भूमिका त्याच्या अतिशय संयत व्यक्तिमत्वाला स्वस्थ बसू देत नाही तो अंतर्गत संघर्ष अतिशय मोजक्या आणि कुठल्याही नाट्यमय संवादांशिवाय त्याने ज्या लाजवाबपणे उभा केलाय त्याला तोडच नाही.

तसा चर्चानाट्य इतक्या प्रभावीपणे मांडणारा पत्रकारितेवरचा हा काही पहिला हॉलीवूडपट नव्हे, चौकस जागृत पत्रकारितेचा धडा घालून त्यात वॉटरगेट् सारखा विषय बाहेर आणणारा "ऑल् द् प्रेसिडेंटस् मेन" ही असाच होता, पण त्यातही पार्किंग लॉटमध्ये अचानक उपटणारा तो गुढ खब-या चित्रपटाची उत्कंठा वाढवायचा, इथे तर ते ही नाही, आहे फक्त स्वच्छपणे उलगडत  जाणारं थंडगार, कोरडं पण तितकंच अंगावर काटा उभं करणारं उलट्या काळजाचं वास्तव. तसा हा चित्रपट न्यायव्यस्थेच्या आणि पत्रकारितेच्या भलत्याच किचकट तांत्रिकतेनं भरलेला असला तरी ज्या चिमुकल्यांवर हे अत्याचार त्यांच्या नकळत्या वयात झाले,  त्यांना न्याय कसा मिळाला हा प्रश्न तुम्हाला आपसूकच खिळवून ठेवतो.

अशा विषयाला न घाबरता, सामर्थ्यवान कॅथलिक साम्राज्याला, ज्याच्या वाटेला जायला अमेरिकेचा असो किंवा युरोपातला असो - होऊ घातलेला, निवडून आलेला अध्यक्षही धजावत नाही त्याला आव्हान देणारी पत्रकारिता कौतुकास्पद का अशी पत्रकारिता वाढू शकेल ती जीवापाड जपलेली लोकशाही कौतुकास्पद, का या सगळ्याचा कुठल्याही भावनाप्रक्षोभकतेशिवाय मागोवा घेणारा हा चित्रपट कौतुकास्पद या विचारात हा चित्रपट कधी संपला कळलाच नाही.

ऑस्करच्या शर्यतीत जिंकलेला हा चित्रपट, एवढ्या सगळ्या प्रयत्नांनतर डॉक्यूमेंट्री म्हणून न लक्षात राहता एक अस्वस्थ करणारा अनुभव म्हणून लक्षात राहातो... हे भारीच ना!!

1 Comments:

Blogger Unknown said...

Good one !! Keep Writing!

March 9, 2016 at 1:00 AM  

Post a Comment

<< Home