फाऊंडर : जनक - मॅक्डाॅनल्डस् च्या साम्राज्याचा
आपण कधी कुठे प्रवासाला निघालो, की एक अनुभव हमखास येतो. जिथे सगळंच अनोळखी असतं, जागा, माणसांचे आचारविचार, त्यांच्या कपडेलत्त्यांचे ढंग... वगैरे. तिथे जरा नाही म्हणलं तरी आपलं मन काही ओळखीच्या खुणा शोधत असतं. की ज्यायोगे ती खूण हवीशी वाटणारी एक सुरक्षिततेची भावना किमानपक्षी देऊन जाते. हो की नाही...?
जगात अनेकांना अनेक देशात, अगदी आपल्या देशासकट.. ही सुरक्षितता एक खूण देऊन जाते... एक भला थोरला, दूरूनही दिसणारा, लखलखता पिवळा, कमानींनी बनलेला... m... एम् ...मॅकडोनाल्डस् चा...
बाकी काही असो पण एक खात्री असते, आपल्याला माहिती असलेली, एक किमान स्वच्छता असलेली, वर्षानुवर्षं जराही न बदलेली अशी चव... तोच तो खमंग वास... अगदी तशीच आखीवरेखीव रचना आपल्याला मिळणार. आणि न कळत आपल्या मनाला ती आश्वासक आणि त्यातून येणारी सुरक्षित भावना देऊन जाणार.
ही इतक्या देशातल्या लोकांना एकसारखी भूरळ घालणारी, एक सुरक्षितता देणारी, हवीहवीशी वाटणारी खूण तयार करणं हे नक्कीच ये-यागबाळ्याचं काम नाही. ती तयार झालीच कशी, त्यामागे कोणाचे कष्ट, कोणाची दृष्टी, कोणाची जिद्द असणार, त्याचा इतिहास काय असेल हा आपल्याला त्या कुरकुरीत फ्रेंच फ्राईज चघळताना पडणारा नेहमीचा प्रश्न. त्याचंच उत्तर देणारा आणि तो इतिहास सांगता सांगता आपल्याला अंतर्मुख करणारा चित्रपट म्हणजे नुकताच आलेला हॉलीवूडपट.. "फाऊंडर" !!
त्याच्या नावाप्रमाणेच हा चित्रपट साधा आहे, पण तरीही तितकासा सोपा नाही. रे क्राॅक्स् या चरित्रनायकाचा ५२ ते ७५ असा २०-२५ वर्षाचा प्रवास दाखवणारा हा चित्रपट, त्याच्यात आंतर्बाह्य होत जाणारे बदल तर दाखवतोच, पण ज्या अमेरिकन मानसिकतेचं तो m हे निर्विवाद प्रतिक आहे त्या अधिकाधिक आक्रमक बनत चाललेल्या अमेरिकन् मानसिकतेची उकल करणारा पण आहे.
तशी आपल्याला आता हिंदी चित्रपटांतूनही चरित्रात्मक चित्रपटांची सवय झालेली आहे. अगदी अलिकडच्या "दंगल"पर्यंत. त्यात ज्याच्या/जिच्या आयुष्यावर तो बेतलाय त्याचं उदात्तीकरण करायचं हेच काहीसं सूत्र असतं त्यात किंवा कधीतरी अगदीच दाऊद वगैरेवर असेल तर त्याचं खलनायकीकरण केलेलं बघतो आपण.
याऊलट इथे रे क्रॉक्स् हा सुरवातीला आपली सहानभूती मिळवतो, नंतर काही ठिकाणी आपल्याला हसवतो, त्याच्या विजिगिषू वृत्तीने आपलं कौतुक मिळवतो, पण बघता बघता त्याची तीच विजिगिषू वृत्ती महत्वाकांक्षेत कशी बदलते, आणि ती महत्वाकांक्षा राक्षसी कशी बनते ते आपल्याला कळतच नाही. घाम गाळून काम करणारा, यशाच्या मागे धावणारा, त्या यशाने कसा बेभान होत जातो, त्या यशासाठी ज्या खांद्यांवर तो उभा आहे ते खांदेच जमिनीत गाडायला कसा तयार होतो हा प्रवास खरंच आपल्याला आंतर्मुख करत जातो.
या त्याच्या प्रवासाला "यशाचा चढता आलेख" असं गोंडस नाव जग देतं. पण अमेरिकन भांडवलशाहीचं मूर्तिमंत रूपक असणारा हा रे क्रॉक्स् त्या भांडवलशाही खेळाचे नियम कसे निष्ठूर, धूर्त आणि काहीसे पाशवी आहेत हे आपल्याला सांगून जातो. वयाच्या ५२व्या वर्षीही स्वप्न पाहाणं जितकं स्फूर्तिदायक, तितकीच यशाची झिंग आपल्याला जवळजवळ अंध कशी करत जाते किंबहूना यश आणि इतरांना भरडणं हया एकाच नाण्याच्या दोन बाजू तर नाहीत ना असा विचार आपल्याला देऊन जातो.
लेझे फेअर इकॉनॉमी कष्ट करणा-यांना संधी देते पण एकदा यश मिळाल्यावर त्याचा होणारा गुणाकार त्याच्या प्रतिस्पर्ध्याच्या अस्तित्वालाच नाहीसा करतो का हे विचारावंसं आपल्याला वाटतं. रे क्रॉक्स् बोलताना म्हणतो "माझा प्रतिस्पर्धी जर बुडत असेल तर त्याच्या बोटीला अजून मोठं भोक कसं पाडता येईल हे पाहाणं माझं काम आहे". आजच्या जागितिकीकरणाच्या, जगाशी सतत प्रतिस्पर्धा करणा-या या युगात आपल्या मुलामुलींची मुल्य हीच असणार का हा विचार मनाला विषण्ण करून जातो.
रे क्राॅक्स् चं काम करणारा गुणी कलाकार मायकेल किटन् आपल्यासमोर हा सगळा प्रवास फारच जिवंतपणे उभा करतो. गेल्या तीन वर्षात "बर्डमॅन", "स्पॉटलाईट" अशा पुरस्कार मिळवणा-या चित्रपटांनंतर याही वर्षी त्याची ही प्रमुख भूमिका भारावून जाते.
रे ची अंगभूत अस्वस्थता, कामाखेरीज सगळंच दुय्यम वाटणारं त्याचं भिरभिरतं मन, यशाची प्रथम लागलेली चटक मग लागलेली हाव कुठलाही आक्रस्ताळेपणा न करता तो आपल्याला भिडवतो.
दिग्दर्शक जॉन ली हॅनकॉक आपल्याला ह्या आधीही काही उल्लेखनिय चरित्रपट दाखवत आलेलाच आहे, "ब्लाईंड साईड" मधून त्याने आपल्याला एका लाघवी गो-या आईची दत्तक घेतलेल्या धटिंगण काळ्या फुटबॉल प्लेअर् बरोबरची नाजूक यशोगाधा दाखवलीच आहे (सॅंड्रा बुलकला ऑस्कर देणारी). ही अनोखी यशोगाधा ज्या उदात्त लोकशाहीचे धडे देणा-या अमेरिकेत घडू शकते त्याच अमेरिकेचं असंही दर्शन तो आपल्याला तितक्याच प्रभावीपणे दाखवून देतो.


